पुण्यात अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई – ११० जणांवर गुन्हे दाखल!; अनधिकृत फ्लेक्स हटवले, ५.२३ लाखांचा दंड वसूल

pmc2_1681951188222_1681951195664.webp

पुणे, ७ फेब्रुवारी २०२५ – पुणे महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि जाहिराती लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील तीन महिन्यांत शहरातील विविध पोलिस ठाण्यांत ११० जणांविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

महापालिकेची कठोर भूमिका:
न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने अवैध जाहिरातदारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. सहाय्यक आयुक्तांना अंमलबजावणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून, परिमंडळ उपायुक्त हे पर्यवेक्षक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे आता शहरातील सार्वजनिक मालमत्तांवर अनधिकृत जाहिराती आढळल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

दंड आणि गुन्हे:
गेल्या तीन महिन्यांत ५ लाख २३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. प्रती फ्लेक्स १,००० रुपये दंड आकारला जात असूनही काही जाहिरातदार वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यापुढेही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

महापालिकेचे आवाहन:
शहरातील नागरिक, जाहिरातदार, व्यापारी आणि उद्योजक यांनी महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत जाहिराती लावू नयेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

संपादक : या कारवाईमुळे पुण्यात अनधिकृत जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Spread the love

You may have missed