पुणे: येरवड्यात दोन इसमांकडून पिस्तूलसह जिवंत काडतूस जप्त – पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

पुणे, ७ फेब्रुवारी २०२५ – येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने तडाखेबंद कारवाई करत वाडिया बंगल्याजवळील परिसरात दोन इसमांना अटक करून त्यांच्याकडून एक पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त केला.
पोलीस उपायुक्त श्री. हिम्मत जाधव व सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या सूचनेनुसार, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
घटनाक्रम:
५ फेब्रुवारी रोजी, येरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस शिपाई अमोल गायकवाड व विशाल निलख हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, वाडिया बंगल्याजवळ दोन इसम अग्नीशस्त्र विक्रीसाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे १ पिस्टल व १ जिवंत राऊंड सापडले.
अटक आरोपींची माहिती:
१. प्रविण विकास कसबे (वय २९, रा. आंबेगाव, कात्रज, पुणे)
२. प्रतिक दादासाहेब रणवरे (वय २५, रा. येवलेवाडी, पुणे)
येरवडा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा क्रमांक १०४/२०२५ नोंदवून भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ३०,०००/- रुपये किमतीचे एक पिस्टल आणि एक राऊंड जप्त करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि तपास:
या कारवाईत पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सहायक पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ४) श्री. हिम्मत जाधव, तसेच सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कार्यवाही केली.
ही कारवाई सपोनि सुनिल सोळुंके, सर्व्हेलन्स अधिकारी पोउपनि महेश फटांगरे, पोउपनि प्रदीप सुर्वे, पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, तसेच पोलीस अंमलदार अनिल शिंदे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे आणि बालाजी सोगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
या घटनेमुळे अवैध शस्त्र तस्करीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके करीत आहेत.