नागरिकांना दिलासा: नाव, पत्ता, मोबाईल नंबर बदल एकाच पोर्टलवर शक्य; पोस्टाने मिळणार अपडेटेड ओळखपत्र

नवी दिल्ली : पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र यांसारख्या महत्वाच्या कागदपत्रांमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर बदलण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांत चकरा मारण्याची गरज आता लवकरच संपणार आहे. केंद्र सरकार ‘युनिफाइड डिजिटल आयडेंटिटी सिस्टम’च्या माध्यमातून नागरिकांसाठी एकच पोर्टल सुरू करण्याच्या तयारीत आहे.
या नव्या पोर्टलवरून नागरिकांना आपल्या सर्व ओळखपत्रांमध्ये आवश्यक बदल करता येणार आहेत. बदल झाल्यानंतर, केवळ सात कामकाजाच्या दिवसांत नव्या माहितीसह अद्ययावत ओळखपत्र थेट पोस्टाद्वारे घरी मिळणार आहे. तसेच, इच्छित असल्यास कार्यालयात जाऊनही नवे ओळखपत्र मिळवता येणार आहे.
कसे करणार काम?
पोर्टलवर सर्व प्रमुख ओळखपत्रांचे डेटा एकत्र करण्यात येणार आहे. वापरकर्त्याने पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, पत्ता, मोबाईल नंबर किंवा इतर तपशील बदलण्यासाठी विशिष्ट पर्याय निवडता येईल. आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, बदल सबमिट केल्यावर तीन दिवसांत प्रोफाइलवर अद्ययावत माहिती दिसणार आहे.
नवे ओळखपत्र कसे मिळेल?
बदलांसह नवे ओळखपत्र मिळवण्यासाठी पोर्टलवरूनच शुल्क भरण्याची आणि अर्ज करण्याची सोय असेल. अर्ज केल्यानंतर, सात कामकाजाच्या दिवसांत नवे कागदपत्र पोस्टाद्वारे पोहोचवले जाईल. तसेच, कार्यालयात जाऊन ते घेण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. अर्ज केल्यानंतर, मोबाइलवर वितरणाची तारीख आणि वेळ सूचित केली जाईल.
सध्या चाचणी सुरू
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रणालीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. डाटा सुरक्षेसाठी फुलप्रूफ व्यवस्था उभारण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये ९२ टक्क्यांहून अधिक अचूकता दिसली आहे. ९८ टक्के अचूकतेचा टप्पा गाठल्यानंतर परीक्षणासाठी प्रणाली सुरू केली जाईल आणि काही दिवसांत नागरिकांसाठी पोर्टल खुले करण्यात येईल.
सध्या पोर्टलचे नाव ठरवले गेले नसले तरी अंतिम परीक्षणानंतर नाव जाहीर होणार आहे.
—