पूणे: हडपसरमध्ये धक्कादायक प्रकार: महिलेकडे तब्बल 300 मांजरी, रहिवाशांत भीतीचे वातावरण

पुणे : हडपसर येथील मार्व्हल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत एका महिलेकडे तब्बल 300 हून अधिक मांजरी असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या चार वर्षांपासून या महिला आणि तिच्या बहिणीसोबत 3बीएचके फ्लॅटमध्ये या मांजरी राहत असून त्यामुळे रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
रहिवाशांचा संताप
सोसायटीमधील अनेक रहिवाशांनी या मांजरींमुळे होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारी केल्या आहेत. “मांजरींच्या वासामुळे आमचे दरवाजे व खिडक्या उघडणे कठीण झाले आहे. ड्रेनेजला अडथळा येत असून, मांजरींच्या रडण्याचा सततचा आवाज त्रासदायक ठरत आहे,” असे एका रहिवाशाने सांगितले.
2020 मध्ये या महिलेकडे 50 मांजरी असल्याचे लक्षात आले होते. आता मात्र मांजरींची संख्या 300 हून अधिक झाल्याने, आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पालिका आणि पोलिसांची कारवाई
रहिवाशांच्या तक्रारीनंतर पुणे महानगरपालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत फ्लॅटच्या मालक रिंकू भारद्वाज आणि तिच्या बहिणी रितू भारद्वाज यांना नोटीस बजावली आहे. पुणे एसपीसीएनेही 48 तासांत मांजरी हटवण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.