पुणे: तीन वर्षांनी सुचले नियम; पुणे महापालिकेचा ‘अधिष्ठाता’ गोंधळ उघड
पुणे : नियम आधी की सोय आधी, असा प्रश्न निर्माण करणारा प्रकार पुन्हा एकदा पुणे महापालिकेत समोर आला आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत तब्बल तीन वर्षे चुकीची नियुक्ती करून अखेर प्रशासनाला “नियम” आठवले आहेत.
शरीररचनाशास्त्र विभागाच्या प्रमुखांकडे द्यायचा पदभार जीवरसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांकडे देऊन महापालिकेने नियमांना हरताळ फासल्याचे उघड झाले आहे. ऑगस्ट २०२३ पासून सुरू असलेली ही चूक अखेर आता दुरुस्त करण्यात आली असून प्रा. डॉ. सुनीता सावंत यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, २०११ च्या शासन आदेशात स्पष्ट नमूद असतानाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हा नियम तीन वर्षे लक्षात न येणे हीच बाब आश्चर्यकारक ठरत आहे. “नियम कागदावर आणि निर्णय मनाप्रमाणे” अशीच प्रशासनाची कार्यपद्धती असल्याचा टोमणा आता नागरिकांकडून मारला जात आहे.
दरम्यान, याआधीच्या अधिष्ठात्यांवर प्रवेशासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून कारवाई झाल्यानंतरही नवीन अधिष्ठाता नेमण्याचा निर्णय महापालिकेला अद्याप घेता आलेला नाही. त्याऐवजी “अतिरिक्त कार्यभार” या तात्पुरत्या उपायावरच गाडी चालवली जात आहे.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अखेर हा गोंधळ दुरुस्त करण्याचे आदेश दिले असले तरी, “चूक झालीच कशी?” आणि “ती दुरुस्त करायला तीन वर्षे का लागली?” या प्रश्नांची उत्तरे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहेत.
एकंदरीत, वैद्यकीय शिक्षणासारख्या गंभीर क्षेत्रातही महापालिकेचा कारभार ढिसाळच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले असून, ‘उशिरा का होईना, पण शहाणपण आले’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.