पुणे; आता नागरी वेशातील गुप्त पोलीस वाहतूक पोलिसांवर नजर ठेवणार; चिरीमिरी घेताना आढळल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करणार – पोलीस आयुक्तांचा इशारा

पुणे : नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर इशारा दिला आहे. यापुढे अशा प्रकारांमध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वाहतूक पोलिसांवर आरोपांचे ढग
पुण्यात वाहतूक व्यवस्थेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या वाहतूक कोंडीच्या काळात अनेक वाहतूक पोलिसांवर नियमभंग करणाऱ्या चालकांकडून पैसे उकळल्याचे आरोप वारंवार होत आहेत. चौकात उभे राहण्याऐवजी काही पोलीस कर्मचारी आडबाजूला उभे राहून वाहनचालकांना गाठत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. घाबरलेल्या चालकांकडून मोठ्या दंडाच्या भीतीने चिरीमिरी घेतली जात असल्याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
सजगतेसाठी नवीन यंत्रणा
पोलीस आयुक्तांनी या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काही विशेष पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी साध्या नागरी वेशात वाहनचालक म्हणून शहराच्या विविध भागात फिरणार आहेत. वाहतूक पोलिसांकडून नियम भंग करणाऱ्या चालकांकडे पैशांची मागणी केली जाते का, याची पाहणी करण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे.
वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवर ताण, पण दोष माफ नाही
वाहतूक पोलिसांवर कामाचा मोठा ताण असला तरी त्यांनी नागरिकांशी योग्य प्रकारे वागावे आणि नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे. “वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. नागरिकांवर दंडात्मक कारवाई करताना कोणत्याही प्रकारच्या अवैध वर्तनाला स्थान दिले जाणार नाही,” असे अमितेश कुमार यांनी ठामपणे सांगितले.
नागरिकांची भूमिका महत्त्वाची
वाहतूक पोलीस आणि नागरिक यांच्यातील पारदर्शकतेसाठी नागरिकांनीही अशा प्रकारांबाबत जागरूक राहून संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आयुक्तांच्या या पावलामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.