“रक्षकच झाले भक्षक?” – वाघोलीतील ‘खाकी’चा धक्कादायक चेहरा उघड!

IMG_20260409_122035.jpg

पुणे : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील काही जणच जर नागरिकांना धमकावून खंडणी उकळू लागले, तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा? वाघोली पोलीस ठाण्यातील ताज्या प्रकाराने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

हॉटेलच्या पार्किंगमध्ये शांतपणे बसलेल्या तरुण-तरुणीला “सेक्स रॅकेट चालवताय” अशी धमकी देत तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट खंडणीचा उद्योगच सुरू केल्याचे समोर आले आहे. कायदा शिकवणारेच कायद्याचा गैरवापर करून भीतीचं वातावरण निर्माण करत असतील, तर गुन्हेगार आणि पोलीस यांच्यात फरक तरी काय उरतो?

याहून धक्कादायक म्हणजे विरोध केल्यावर संबंधित तरुणाला मारहाण करण्यात आली आणि शेवटी बदनामीच्या भीतीने त्याच्याकडून ऑनलाइन पैसे उकळण्यात आले. “डिजिटल इंडिया”च्या युगात खंडणीही आता ऑनलाइन! खाकीची ही ‘अपडेटेड’ आवृत्ती पाहून नागरिकांनी टाळ्या वाजवायच्या का, असा उपरोधिक सवाल उपस्थित होत आहे.

घटनेची तक्रार वरिष्ठांकडे गेल्यानंतरच कारवाई झाली आणि तिघांना निलंबित करण्यात आले. मात्र, प्रश्न असा आहे की—अशा घटना घडल्यावरच कारवाई होणार का? की आधीच अशा प्रवृत्तींवर लगाम घालण्यासाठी ठोस यंत्रणा उभारली जाणार?

पुणे पोलीस आयुक्तांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली असली, तरी “एकाच घटनेपुरतेच शिस्तभंग?” की संपूर्ण यंत्रणेतच आत्मपरीक्षण होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा डागाळली असून, “जनतेचा विश्वास जिंकण्याऐवजी गमावण्याची स्पर्धा सुरू आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

Spread the love