कर्वेनगरमध्ये निवासी परिसरात राडारोडा-कचऱ्याचे ढीग; दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त, महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

0
HWF1YPDbQAAH7Mi

कर्वेनगरमध्ये निवासी परिसरात राडारोडा-कचऱ्याचे ढीग; दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त, महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

दिनांक : २ नोव्हेंबर २०२६ : कर्वेनगर, पुणे
एकीकडे पुणे महानगरपालिका शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे कर्वेनगरमधील निवासी परिसरातच मोठ्या प्रमाणावर राडारोडा आणि कचरा टाकला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. गिरिजा शंकर विहार आणि तारा रेसिडेन्सीच्या पाठीमागील बाजूस, दुचाकी पुलाच्या अलीकडे भुजबळ टाउनशिपकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत दररोज राडारोडा आणि कचरा टाकला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

या ठिकाणी बांधकामाचा राडारोडा आणि कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे लगतच्या निवासी सोसायट्यांमधील रहिवाशांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. मोकळ्या जागेचा अशा प्रकारे वापर होत असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महापालिकेकडूनच राडारोडा टाकला जातोय का?

संबंधित ठिकाणी टाकला जाणारा राडारोडा आणि कचरा पुणे महानगरपालिकेकडूनच आणला जात आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेचा यामध्ये सहभाग नसेल, तर हा प्रकार नेमका कोणाकडून सुरू आहे, याची चौकशी करून प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राडारोडा हटवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून साचलेला राडारोडा व कचरा हटवावा, परिसराची स्वच्छता करावी आणि भविष्यात येथे पुन्हा कचरा टाकला जाणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

निवासी परिसरालगत निर्माण झालेल्या या अस्वच्छतेकडे महापालिका प्रशासन कधी लक्ष देणार आणि नागरिकांना या त्रासातून कधी दिलासा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed