“गर्लफ्रेंडसाठीचा राग; पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाने केली मारहाण”
चिंचवड : “माझ्या गर्लफ्रेंडला शिवी का देतोस?” या कारणावरून तरुणाला शस्त्राने मारहाण करण्यात आल्याची घटना चिंचवडच्या मोहननगर परिसरात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अभिजित महादेव खाडप (वय २२, रा. पवार वस्ती, ताथवडे) हा मारहाणीत जखमी झाला असून, त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणी आरोपी चैतन्य राठोड (वय २०, रा. फुलेनगर झोपडपट्टी, मोहननगर, चिंचवड) आणि जय (पूर्ण नाव अज्ञात, रा. गाय वासरू चौक, मोहननगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अभिजित खाडप शुक्रवारी दुपारी गाय वासरू चौकात थांबला असता, आरोपी त्याच्या जवळ आले. आपसात संगनमत करून, “माझ्या गर्लफ्रेंडला शिवी का देतोस?” असा प्रश्न विचारत त्यांनी त्याला शिवीगाळ सुरू केली आणि राठोडने चाकूसारख्या हत्याराने अभिजितच्या छातीखाली, हातावर, आणि डोक्यावर वार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.