प्रियकराच्या घरभाड्यासाठी अल्पवयीन प्रेयसीनेच काकाच्या बंगल्यावर दरोड्याच्या कटाची आखणी
येरवडा पोलिसांकडून तीन तरुणांना अटक; दोघे इंजिनीअर

Yerwada-Police-Station-3-1536x864.webp

पुणे : प्रियकराला घराचे भाडे देण्यासाठी ३० हजार रुपयांची गरज असल्याने अल्पवयीन प्रेयसीने स्वतःच्या काकाच्या बंगल्यावर दरोडा टाकण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रियकरासह तीन तरुणांना अटक केली आहे.

यश मोहन कुऱ्हाडे (वय २०, रा. केसनंद), ऋषभ प्रदीप सिंह (वय २१, रा. चऱ्होली) आणि राज विवेक भैरामडगीकर (वय २०, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिलेचा बंगला कल्याणीनगर परिसरात आहे. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोन अनोळखी तरुण चाकू व दोरीसह बंगल्यात शिरले. मात्र घरातील महिलांनी जोरदार आरडाओरडा केल्यामुळे चोरटे तात्काळ पळून गेले. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तपास सुरू केला.

तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण कट उघडकीस आला. आरोपी यश कुऱ्हाडे याचे तक्रारदार महिलेच्या दिराच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. घरभाड्यासाठी ३० हजार रुपयांची गरज असल्याचे कुऱ्हाडेने प्रेयसीला सांगितल्यानंतर तिनेच काकाच्या घरी चोरी करण्याचा कट आखल्याचे तपासात स्पष्ट झाले.

दरोडा टाकण्यासाठी आरोपी येणार असल्याने अल्पवयीन मुलीने घराचे दार उघडे ठेवले होते. मात्र आरोपी घरात प्रवेश करताच महिलांनी आरडाओरडा केल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला.

कुऱ्हाडे हा बारावी नापास असून, ऋषभ सिंह हा मेकॅनिकल इंजिनीअर आहे, तर राज भैरामडगीकर हा इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

Spread the love