डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट; सोशल मीडिया अकाउंटवर कारवाईची मागणी
पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पेरियार तसेच प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या छायाचित्रांचा वापर करून सोशल मीडियावर आक्षेपार्ह व अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित सोशल मीडिया अकाउंटची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
लक्ष्मीनगर, येरवडा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन रोहिदास चव्हाण (वय ४३) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. चव्हाण हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहरचे उपाध्यक्ष असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी फेसबुक पाहत असताना ‘Agra Duniya’ या फेसबुक आयडीवरून संबंधित पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आले. या पोस्टमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पेरियार आणि स्टीफन हॉकिंग यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्ये करण्यात आल्याचा आरोप आहे.
या मजकुरातून धार्मिक व वैचारिक मुद्द्यांचा आधार घेत विशिष्ट समाजाबाबत गैरसमज, असंतोष आणि द्वेष निर्माण होईल, अशा स्वरूपाचा मजकूर जाणीवपूर्वक प्रसारित केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्यासह दोन समाज किंवा समुदायांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, या पोस्टमुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, सोशल मीडियाचा वापर करून अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी सचिन रोहिदास चव्हाण, सुनिता संजयकुमार गायकवाड आणि संजयकुमार गायकवाड यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांकडून संबंधित सोशल मीडिया पोस्ट, अकाउंट आणि त्यामागील व्यक्तीची माहिती तपासण्याचे काम सुरू असून, पुढील कारवाई तपासानंतर केली जाणार आहे.