संगमवाडीत अवाढव्य होर्डिंग उभारणी; परवानगी आहे का, सुरक्षेचे नियम कुठे?
पुणे, दि. ६ ऑक्टोबर : संगमवाडीतील मुख्य रस्त्याच्या परिसरातील मोकळ्या जागेत अवाढव्य लोखंडी सांगाडा उभारून होर्डिंग उभारण्याचे काम सुरू आहे. या होर्डिंगसाठी पुणे महापालिकेची अधिकृत परवानगी आहे का, तसेच ते निर्धारित नियम व आकारमानात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उंचावर काम करणाऱ्या कामगारांकडे हेल्मेट, सेफ्टी हार्नेस आणि सेफ्टी नेट यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे कामगारांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
या होर्डिंगची परवानगी, संरचनात्मक सुरक्षितता आणि कामादरम्यान पाळल्या जाणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांची तपासणी झाली आहे का? संभाव्य दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने तातडीने पाहणी करून होर्डिंगची परवानगी, संरचनात्मक सुरक्षितता आणि कामगारांच्या सुरक्षा उपाययोजनांची पडताळणी करावी. नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.