शिक्षकाच्या बदलीसाठी दीड लाखांची लाच; रायगड ZP अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला तीन दिवसांची पोलीस कोठडी
रायगड : महाराष्ट्र माझा न्युज – शिक्षकाच्या बदलीसाठी दीड लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. बुधवारी (23 सप्टेंबर) ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी भस्मे यांनी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने ACBकडे माहिती दिल्यानंतर तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी कथित लाचेची रक्कम स्वीकारताना भस्मे यांना ताब्यात घेण्यात आले.
भस्मे हे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात वित्त लेखा सहाय्यक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाते. त्यांच्याकडे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी होती. दरम्यान, त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या कथित लाच व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच रकमेची मागणी कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली होती का, याचा ACB तपास करीत आहे. दरम्यान, या प्रकरणात जिल्हा परिषद अध्यक्षांचा सहभाग असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.