व्हायरल व्हिडिओची वाट पाहणारे प्रशासन?; व्हिडिओनंतरच वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई

0
InShot_20260807_183952620

पुणे : महाराष्ट्र माझा न्युज – वाहतूक नियमनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांकडूनच कर्तव्यस्थळ सोडून मनमानी कारवाई होत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, संबंधित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच प्रशासनाला जाग आल्याचे चित्र दिसून आले.

विश्रामबाग वाहतूक विभागातील पोलीस हवालदार मनसुब हाजीमलंग शेख यांना वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी निलंबित केले आहे. आदेशानुसार, अलका चौक येथे कर्तव्यावर असताना त्यांनी नेमून दिलेले ठिकाण सोडून एलआयसी कॉलनी परिसरात जाऊन एका दुचाकीस्वाराला इतर कोणतेही वाहन न थांबवता संशयास्पद आणि धोकादायक पद्धतीने अडविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

प्रश्न असा उपस्थित होतो की, वरिष्ठांनी कर्तव्यस्थळ न सोडण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या असतानाही हा प्रकार घडला कसा? आणि तो वरिष्ठांच्या निदर्शनास आला नाही का? की सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच यंत्रणा खडबडून जागी झाली?

आदेशात या प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता अशा प्रकारांवर केवळ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच कारवाई होणार की नियमित देखरेख आणि जबाबदारीही निश्चित केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध प्राथमिक विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता मिळणार असून मुख्यालयाची पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दररोज पोलीस मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed