गाडीखान्यात मनपाचा अजब कारभार; पेशंटऐवजी ‘अॅम्ब्युलन्स’ बनली मालवाहू गाडी
रुग्णाचा जीव गेला तरी चालेल, पण औषधांचे पार्सल वेळेत पोहोचले पाहिजे!— मनपाचा अजब न्याय.
पुणे: महाराष्ट्र माझा न्युज – नेहमीच अजब प्रयोगांसाठी चर्चेत असणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी असणाऱ्या अॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) आता रुग्णांऐवजी चक्क औषधांची पोती आणि खोकी वाहून नेण्यासाठी वापरल्या जात आहेत. बरेच रुग्णालयाची एम्बुलेंस गाडीखान्यामध्ये औषध घ्यायला येत आहे. रुग्णांचा जीव टांगणीला, अॅम्ब्युलन्स मात्र औषध वाहतुकीत व्यस्त! शुक्रवार पेठेतील गाडीखाना परिसरातील मनपाच्या ‘सेंट्रल मेडिकल स्टोअर’मधून संपूर्ण पुण्यातील दवाखान्यांना औषध पुरवठा केला जातो. औषध वाहून नेण्यासाठी विशेष गाड्या असणे अपेक्षित असताना, मनपाने चक्क कोरेगाव पार्क आणि कोंढवा भागातून आलेल्या रुग्णवाहिकांचा वापर औषध वाहतुकीसाठी सुरू केला आहे. सध्या पुण्यात पाऊस आणि अपघातांचे प्रमाण वाढले असताना, रुग्णांना वेळेवर अॅम्ब्युलन्स मिळण्याऐवजी या गाड्या गाडीखान्यात औषधे लोड करताना दिसत आहेत. यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
पहा व्हिडिओ
महापौर-आयुक्तांच्या गाड्या वापरा ना!: औषध वाहतुकीसाठी गाड्या कमी पडत असतील तर नवीन खरेदी करा. मनपाकडे पैसे नसतील, तर औषधे वाहून नेण्यासाठी रुग्णांच्या अॅम्ब्युलन्स वापरण्याऐवजी थेट महापौर किंवा आयुक्तांच्या आलिशान गाड्या का वापरल्या जात नाहीत? अदलाबदल की ढिसाळपणा?: अॅम्ब्युलन्सचे काम रुग्ण वाहतूक करणे आहे, मालवाहतूक नाही. आज औषधे वाहत आहेत, उद्या कचरा वाहतुकीसाठी अॅम्ब्युलन्स वापरली तर नवल वाटायला नको! मनपा आयुक्त आणि आरोग्य विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन ‘पेशंट’च्या गाड्या ‘पार्सल’ सेवेसाठी वापरणे तातडीने बंद करावे, हीच पुणेकरांची अपेक्षा आहे.