पाऊस उशिरा, तरी जलपर्णी हटविण्यास विलंब; नदीत पाणी वाढण्यापूर्वी विल्हेवाट पूर्ण होणार का?

0

पुणे, दि. ६ जुलै : मुळा-मुठा नदीतील जलपर्णी हटविण्याच्या कामांवर दरवर्षी करोडो रुपयांचा खर्च होत…

Spread the love
20260706_21545PMByGPSMapCamera

पुणे, दि. ६ जुलै : मुळा-मुठा नदीतील जलपर्णी हटविण्याच्या कामांवर दरवर्षी करोडो रुपयांचा खर्च होत असतानाही प्रत्यक्ष कामांच्या नियोजनावर आणि अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारजे ते कर्वेनगर परिसरातील नदीपात्राची पाहणी केली असता मुख्य नदीपात्रातील काही जलपर्णी काढण्यात आल्याचे दिसत असले, तरी नदीपात्राच्या कडेला साचलेल्या पाण्याच्या मोठ्या मोठ्या डबक्यांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली असल्याचे वास्तव समोर आले आहे.


कर्वेनगर येथील राजाराम पुलाखाली नदीतून काढलेल्या जलपर्णीचे मोठमोठे ढीग नदीकाठावर साठवून ठेवण्यात आले असून, त्यांची वाहतूक आणि विल्हेवाट लावण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. धरणे भरल्यानंतर विसर्ग सुरू झाल्यास नदीतील प्रवाह आणखी वाढणार असून, त्याआधी ही संपूर्ण जलपर्णी हटवून तिची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जाईल का, याबाबत मोठी शंका व्यक्त केली जात आहे.


विशेष म्हणजे, यंदा पावसाळा नेहमीपेक्षा उशिरा सुरू झाला होता. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांकडे जलपर्णी काढण्यासाठी व तिची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होता. मात्र एवढा वेळ मिळूनही नदीपात्रालगतच्या डबक्यांमधील जलपर्णी काढण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी पाऊस सुरू होईपर्यंत किंवा नदीतील पाण्याची पातळी वाढेपर्यंतच प्रतीक्षा का केली जाते, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
विशेष बाब म्हणजे, वारजे ते कर्वेनगर या परिसरातील नदीपात्राच्या कडेला वाढलेल्या जलपर्णीबाबत आणि नदीकाठावर साठवून ठेवलेल्या जलपर्णीच्या ढिगांबाबत पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातील अधिकारी, संबंधित कनिष्ठ अभियंता तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र, याबाबत कोणतीही प्रभावी कारवाई किंवा ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जलपर्णी हटविण्याच्या निविदेनुसार नदीतून काढलेली जलपर्णी निश्चित केलेल्या ठिकाणी वाहतूक करून तिची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. मात्र, नदीकाठावर साठवलेले ढीग आणि कडेला असलेल्या डबक्यांमध्ये वाढलेली जलपर्णी पाहता प्रत्यक्ष कामाची व्याप्ती आणि गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. मुख्य नदीपात्रातील जलपर्णी काढली जात असताना बाजूच्या डबक्यांकडे दुर्लक्ष झाल्यास काही दिवसांत त्याच ठिकाणांहून जलपर्णी पुन्हा मुख्य नदीपात्रात पसरण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
आता पुढील काही दिवसांत धरणांमधून विसर्ग सुरू झाल्यास नदीकाठावर साठवलेली जलपर्णी तसेच डबक्यांमधील जलपर्णी नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास जलपर्णी हटविण्याच्या कामांचा उद्देशच फोल ठरेल आणि दरवर्षी होणाऱ्या करोडो रुपयांच्या खर्चाच्या परिणामकारकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
यामुळे जलपर्णी हटविण्याच्या कामांचे नियोजन, प्रत्यक्ष अंमलबजावणी, वाहतूक, विल्हेवाट आणि कामाच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com⁠�
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed