“कायद्याचे रखवालदारच खंडणीखोर? पुणे पोलिसांची ‘दामिनी’ प्रतिमा मलिन!”
पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्याच पोलिसांकडून खंडणी उकळण्याचे प्रकार समोर येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर, असा सवाल उपस्थित होत आहे. प्राचार्याला पॉक्सो कायद्याची भीती दाखवून तब्बल ७ लाख रुपयांची उकळपट्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यात पोलीस उपनिरीक्षकासह ‘दामिनी पथका’तील कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याने पोलिस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
या प्रकरणात उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे आणि ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कायद्याचा धाक दाखवूनच नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार होत असतील, तर गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये फरक उरतो कुठे, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
विशेष म्हणजे, महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘दामिनी पथका’तील कर्मचाऱ्याचे नाव या प्रकरणात समोर आल्याने प्रशासनाच्या निवड प्रक्रियेवर आणि देखरेखीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘सुरक्षा देणारेच जर भीती दाखवून पैसे उकळत असतील, तर सामान्यांनी न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यावी?’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले असले, तरी अशा घटना घडल्यावरच प्रशासन जागे होते का, असा उपरोधिक टोला नागरिकांकडून लगावला जात आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असला, तरी “कारवाईची केवळ घोषणा की प्रत्यक्षात कठोर शिक्षा?” हा प्रश्न कायम आहे. पुणे पोलिसांनी आपल्या घरातील ‘काळे मेंढे’ शोधून काढण्याची हीच खरी वेळ असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.