पुणे: लाचेची मागणी पोलिसांनाच महागात; बंडगार्डन ठाण्यात PSI विरुद्ध गुन्हा

1200-675-23259051-thumbnail-16x9-bribecase.jpg

पुणे : फसवणुकीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीसंदर्भात तक्रार अर्ज दाखल झाला होता. त्या अर्जाची चौकशी पोलिस उपनिरीक्षक खेडकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या प्रकरणात तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी खेडकर यांनी सुरुवातीला दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

याबाबत तक्रारदाराने ३ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीने या प्रकरणाची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान पंचासमक्ष तसेच तक्रारदाराच्या वकिलासमक्ष खेडकर यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

या निष्कर्षानंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यात खेडकर यांच्या विरोधात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त निता मिसाळ आणि पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांच्या पथकाने केली.

Spread the love