येरवडा येथील शहीद अब्दुल हमीद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिमाखात साजरी

येरवडा, १९ फेब्रुवारी: शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा व स्वातंत्र्य सेनानी हकिम अजमल खान उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली.
येरवडा परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत घोड्यावर स्वार असंख्य मावळ्यांनी भाग घेतला. परिसरातील नागरिकांनी या शोभायात्रेचा आनंद घेत शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.




शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना शिवरायांच्या जीवनाचे महत्त्व समजावे यासाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शहीद अब्दुल हमीद शाळेचे उपशिक्षक अब्दुल रज्जाक कोरबु यांनी पंधरा दिवस मेहनत घेतली. त्यांना मुख्याध्यापिका वहिदा शेख, अफरोज मेंहदरगी, कौसर शेख, जावेद शेख व सफिया शेख यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ समाजसेवक व उद्योजक शरदचंद्र कर्नावट, भारतीय सेना निवृत्त अप्पा शिंदे, एजाज खान, कुणाल बडेकर व रफिक भाई भज्जीवाले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
शोभायात्रेच्या निमित्ताने येरवडा परिसरातील नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती व शिवरायांच्या इतिहासाबद्दलचा अभिमान जागवला गेला.