पुणे: येरवडा पोलीस हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात बेमुदत धरणे आंदोलन

पुणे, 23 जानेवारी: येरवडा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात वर्षानुवर्षे राजरोजपणे चालत असलेल्या अवैध धंद्यांविरोधात बहुजन युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष कुलदीपभाऊ वाल्हे करत आहेत.
पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने चालणाऱ्या या बेकायदेशीर धंद्यांविरोधात ठोस कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे. येरवडा परिसरातील नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या या संघटनेने स्पष्ट केले आहे की, जर प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
आंदोलन स्थळ व कालावधी
हे आंदोलन दि. 23 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत पोलीस उपयुक्त परिमंडळ 4 यांच्या कार्यालयाच्या गेटसमोर आयोजित करण्यात आले आहे.
कुलदीपभाऊ वाल्हे यांनी सांगितले की, “आमचा लढा केवळ बेकायदेशीर धंद्यांविरोधात नाही, तर जनतेच्या हक्कांसाठी आहे. प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य करून कारवाई केली नाही, तर याचा परिणाम व्यापक होईल.”

बहुजन समाजाचा पाठिंबा
या आंदोलनाला बहुजन समाजाचा मोठा पाठिंबा मिळत असून, अनेक तरुण व सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहेत. “बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना अशा बेकायदेशीर कृत्यांना थांबवण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे संघटनेने जाहीर केले आहे.
आता प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.