एसटी बसमधील छेडछाड करणाऱ्या मद्यधुंद प्रवाशाला महिलेचा चोप; व्हिडिओ व्हायरल

पुणे: शहरात आणि राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पुण्यातील एका घटनेने समाजाचे लक्ष वेधून घेतले आहे. एसटी बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने महिलेसोबत गैरवर्तन केल्याने संतप्त महिलेने त्याला चोप दिला. ही घटना शनिवारी पुण्यात घडली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नेमकी घटना
शिर्डी येथील शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने आपल्या पती व मुलासोबत एसटी बसने प्रवास सुरू केला होता. प्रवासादरम्यान एका मद्यधुंद प्रवाशाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या महिलेने रुद्रावतार धारण करत त्याला चांगलाच चोप दिला.
पहा व्हिडिओ
पोलीस अनुपस्थितीमुळे संताप
घटनेनंतर महिलेने त्या व्यक्तीला थेट शनिवारवाड्याच्या समोरील पोलीस चौकीत नेले. परंतु, पोलीस चौकीत एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने महिलेने सुमारे अर्धा तास त्याला चौकीतच थांबवून ठेवले. यानंतर तिने गरसेवकांना संपर्क करून घडलेली घटना सांगितली. काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी आले.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ”saamtvnews” या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया मिळत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “बसमध्ये छेड काढणाऱ्या मद्यधुंद प्रवाशाला प्रवासी महिलेने दिला चोप,” असे लिहिण्यात आले आहे.
सोशल मीडियावरील काहींनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले असून, काहींनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
महिला सुरक्षा आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिसांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना समाजासाठी विचार करण्यास भाग पाडणारी ठरली आहे.