पुण्यात मंगळवारी PM मोदींचा दौरा, वाहतुकीत झाले मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

IMG_20241111_005044.jpg

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवार (दि. १२) दौऱ्यानिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यामुळे संबंधित भागातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

वाहतूक बदलाची माहिती

सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनी भागात, ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यान रस्ता बंद राहणार आहे. वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे निलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगड रस्त्याकडे जावे.

बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जाॅगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे मार्ग काढावा.

टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक होणार असून वाहनचालकांनी काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रीज) डावीकडे वळून भिडे पुल चौकातून उजवीकडे जाऊन इच्छित स्थळी पोहचावे.

गरुड गणपती चौक ते भिडे पूल चौक दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गरुड गणपती चौकातून डावीकडे टिळक चौक मार्गे केळकर रस्त्याकडे जावे.


शहरात जड वाहनांना बंदी

मोदी यांच्या दौर्‍यादरम्यान सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे.

जड वाहनांसाठी बंद असलेले रस्ते :

सोलापूर रस्ता (भैरोबा नाला चौकाच्या पुढे)

नगर रस्ता (खराडी बाह्यवळण चौकाच्या पुढे)

आळंदी रस्ता (बोपखेल फाटा चौकाच्या पुढे)

जुना मुंबई-पुणे रस्ता (हॅरीस पुलाच्या पुढे)

ओंध रस्ता (राजीव गांधी पुलाच्या पुढे)

बाणेर रस्ता (राधा हाॅटेल चौकाच्या पुढे)

पौड रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, सासवड रस्ता, हडपसर ते सासवड रस्ता, लोहगाव रस्ता


पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौर्‍यामुळे शहरात वाहतुकीची अधिक खबरदारी घेतली जात आहे, त्यामुळे नागरिकांनी या मार्गदर्शनानुसार नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Spread the love