वारजे-कर्वेनगर:२५ऑगस्ट : नागरिकांना रात्रीच्या वेळी प्रकाश देण्यासाठी उभारलेले महापालिकेचे पथदिव्यांचे खांब सध्या चक्क खासगी जाहिरातींचे ‘डिस्प्ले बोर्ड’ बनल्याचे चित्र वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील परिसरात पाहायला मिळत आहे. महापालिकेचे खांब सार्वजनिक, मात्र त्यावर झळकणाऱ्या जाहिरातींचा फायदा खासगी—मग ‘प्रकाश’ पथदिव्यांचा की कमाईचा? असा बोचरा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
पथदिव्यांच्या खांबांवर विविध व्यावसायिक जाहिरातींचे बोर्ड लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी एका खांबावर एक बोर्ड, तर काही ठिकाणी एक कमी वाटला की दोन-दोन बोर्ड लावल्याचे दिसून येते. त्यामुळे पथदिव्यांच्या खांबांनी प्रकाश देण्याबरोबरच जाहिरातींनाही ‘हक्काची जागा’ उपलब्ध करून दिल्याचे चित्र आहे.
बिल्डर, बांधकाम व्यावसायिक, खासगी शाळा, क्लासेस आणि विविध व्यावसायिकांच्या जाहिराती परिसरातील पथदिव्यांचे खांब तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी झळकत आहेत. महापालिकेचा खांब, सार्वजनिक जागा आणि खासगी जाहिरात—मग जाहिरातदारांसाठी ही ‘फ्रीची जाहिरात सेवा’ आहे का? असा उपरोधिक प्रश्न नागरिक विचारत आहेत.
विशेष म्हणजे, काही जाहिरात बोर्ड अनेक दिवसांपासून त्याच ठिकाणी कायम असल्याचे दिसून येते. नवीन बोर्डांची भर पडत असताना संबंधित यंत्रणेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने ‘बोर्ड लावण्याची परवानगी नसली तरी कारवाईची भीतीही नाही’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
अनधिकृत जाहिरात बोर्डांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होत असून महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचा खासगी व्यावसायिक प्रसिद्धीसाठी वापर होत आहे. उद्या पथदिव्यांच्या खांबावर जाहिरात, परवा रस्त्याच्या दुभाजकावर जाहिरात आणि पुढे संपूर्ण परिसरच जाहिरातींनी व्यापला, तरी कारवाई कधी होणार? असा बोचरा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
महापालिका प्रशासनाने पथदिव्यांच्या खांबांसह परिसरातील अनधिकृत जाहिरात बोर्डांचे तातडीने सर्वेक्षण करून ते हटवावेत. तसेच नियमांचे उल्लंघन करून जाहिराती लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेच्या खांबांचा ‘प्रकाश’ नागरिकांसाठीच राहणार की त्यावर खासगी जाहिरातींचीच चमक कायम राहणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४