कर्वेनगर,प्रभाग ३१,गोसावी वस्तीतील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था; देखभालीवर लाखोंचा खर्च जातोय कुठे?
Oplus_16908288
पुणे | १ नोव्हेंबर २०२६
प्रभाग क्रमांक ३१ मधील गोसावी वस्ती येथील सार्वजनिक शौचालय (PT क्रमांक ८६) मधील अस्वच्छता, कचरा, पाणीपुरवठा आणि ड्रेनेजच्या समस्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शौचालयाची सद्यस्थिती दर्शविणारा एका नागरिकाने चित्रीत केलेला व्हिडिओ समोर आला असून, यासंदर्भात पुणे महानगरपालिकेकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल, स्वच्छता आणि दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत असताना नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित का राहावे लागत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देखभालीवर झालेला खर्च आणि प्रत्यक्ष करण्यात आलेली कामे यांचा ताळमेळ तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
शौचालयाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि इतर सुविधांची तपासणी करावी. मागील काही वर्षांतील देखभाल व दुरुस्तीच्या कामांचा खर्च, ठेकेदारांची देयके, करारातील अटी आणि कामांचा दर्जा यांची तांत्रिक चौकशी व पडताळणी करावी. निकृष्ट काम किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
लाखोंचा खर्च होऊनही शौचालयाची अवस्था सुधारत नसेल, तर हा निधी नेमका कुठे आणि कशासाठी खर्च झाला? देखभालीची कामे नियमित होतात का आणि त्यांची गुणवत्ता तपासली जाते का, याची उत्तरे महापालिका प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक सुविधा मिळण्यासाठी केवळ तात्पुरती डागडुजी न करता नियमित देखभाल आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या तक्रारीनंतर महापालिका प्रशासन प्रत्यक्ष पाहणी करून काय कार्यवाही करते, याकडे गोसावी वस्तीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४