तक्रारी बंद,पण कचऱ्याचा धूर कायम! केशवनगर, फ्लोरिडा रिव्हरवॉक परिसरात महापालिकेच्या तक्रार निवारण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!

0
HXORB0ab0AA0UzL

तक्रारी वारंवार दाखल, पण कारवाई शून्य! फ्लोरिडा रिव्हरवॉक परिसरात कचरा जाळण्याचा धुरळा; महापालिकेच्या तक्रार निवारणाचा कारभार नेमका कसा?

पुणे : उघड्यावर कचरा टाकायचा, तो जाळून परिसरातील नागरिकांना विषारी धुराचा त्रास द्यायचा आणि नागरिकांनी तक्रार केल्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही न करता ती तक्रार बंद करायची! केशवनगरमधील फ्लोरिडा रिव्हरवॉक सोसायटी (पिनकोड ४११०३६) परिसरातील कचरा समस्येबाबत पुणे महापालिकेच्या तक्रार निवारण यंत्रणेवर असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा टाकला जात असून तो जाळण्याचे प्रकारही सुरू असल्याची तक्रार आहे. कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारा विषारी धूर परिसरात पसरत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. स्थानिक हवेच्या गुणवत्तेवरही याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या समस्येबाबत संबंधित नागरिकांनी पुणे महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी नोंदवल्या आहेत. मात्र, प्रत्येक वेळी प्रत्यक्ष समस्या सुटल्याशिवाय तक्रारी बंद केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार नोंदवली जाते, ती बंदही होते; पण प्रत्यक्षातील कचरा आणि धुराचा प्रश्न मात्र कायम राहतो, अशी परिस्थिती असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

मग महापालिकेच्या तक्रारी केवळ कागदोपत्री निकाली काढल्या जात आहेत का? तक्रार बंद करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष स्थळपाहणी केली जाते का? वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असेल, तर जबाबदारी निश्चित कोणाची?

महापालिका प्रशासनाने या परिसराची तातडीने पाहणी करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, कचरा जाळण्याचे प्रकार रोखावेत, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी आणि यापूर्वी दाखल झालेल्या तक्रारींची सद्यस्थिती नागरिकांसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रश्नावर पुणे महापालिका प्रशासन आता तरी प्रत्यक्ष कारवाई करणार की तक्रारी बंद करण्याची औपचारिकताच सुरू राहणार?

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed