कागदात मलम अन् बाटलीत औषध! महापालिकेच्या दवाखान्यांमधील औषधवाटपाची व्यवस्था जुनीच; एफडीएच्या सूचनांनंतरही सुधारणा नाही
पुणे, ता. ३ : महाराष्ट्र माझा न्युज – पुणे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मलम रुग्णांना स्वतंत्र डबीत देण्याऐवजी कधी घरातून आणलेल्या डबीत, तर कधी थेट कागदात गुंडाळून दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे खोकल्याचे औषध स्वतंत्र बाटलीत देण्याऐवजी रुग्णांनाच घरून बाटली आणण्याची वेळ येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या औषधवाटप व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यापूर्वी १७ जुलै रोजी सहकारनगर येथील शिवशंकर पोटे दवाखाना आणि मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयाची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान औषधे आणि मलम योग्य पॅकिंगमध्ये देण्याची आवश्यकता अधोरेखित झाली होती. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला औषधांसाठी स्वतंत्र बाटल्या व मलमांसाठी डब्या उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नसल्याचे चित्र आहे.
६० हून अधिक दवाखान्यांत हजारो रुग्ण
महापालिकेचे ६० हून अधिक बाह्यरुग्ण विभाग, २० प्रसूतिगृहे आणि दोन रुग्णालये आहेत. या आरोग्य केंद्रांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक उपचारासाठी येतात. उपचारानंतर रुग्णांना आवश्यक औषधे देण्यात येतात. मात्र, औषधांच्या वितरणासाठी आवश्यक डब्या आणि बाटल्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना पर्यायी पद्धतींचा वापर करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
घरच्या बाटलीत कफ सिरप; संसर्गाचा धोका
खोकल्याचे औषध देण्यासाठी रुग्णांनी घरून बाटली आणावी लागत असल्याने औषधांच्या स्वच्छतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी उपलब्ध नसलेल्या योग्य बाटलीच्या ऐवजी घरातील वापरलेल्या बाटल्यांचा वापर केला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. काही रुग्णांकडून मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचाही वापर केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. औषधाच्या थेट संपर्कात येणारे पॅकिंग साहित्य स्वच्छ आणि योग्य दर्जाचे नसल्यास संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.
एफडीएच्या सूचनांकडे दुर्लक्ष?
रुग्णांना मलम कागदात गुंडाळून किंवा उघड्या स्वरूपात देणे, तसेच कफ सिरपसाठी रुग्णांवर बाटली आणण्याची जबाबदारी टाकणे, हा प्रकार औषधांच्या सुरक्षित वितरणाच्या दृष्टीने गंभीर मानला जात आहे. एफडीएकडून यापूर्वीच आक्षेप नोंदविण्यात आला असताना ही समस्या कायम राहिल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
१०० मिलीच्या बाटल्यांसाठी निविदा
दरम्यान, रुग्णांना खोकल्याचे औषध देण्यासाठी १०० मिली क्षमतेच्या बाटल्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच मलम आणि कफ सिरप रुग्णांना पॅकबंद स्वरूपातच देण्याबाबत दवाखान्यांतील कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
“रुग्णांना मलम आणि कफ सिरप पॅकबंद स्वरूपातच द्यावे. ते उघड्या स्वरूपात देऊ नये, अशा सूचना एफडीएकडून देण्यात आल्या आहेत. खोकल्याच्या औषधांसाठी १०० मिली क्षमतेच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यासाठी निविदा काढण्याचे नियोजन आहे.”
— डॉ. सुनील आंधळे, प्रभारी वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी, पुणे महापालिका
एफडीएच्या सूचनांनंतरही औषधवाटपासाठी आवश्यक बाटल्या आणि डब्या उपलब्ध करून देण्यास विलंब का होत आहे? रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये प्रशासनाकडून अशी उदासीनता का? याची जबाबदारी निश्चित करून औषधवाटप व्यवस्था तातडीने सुधारण्याची मागणी आता होत आहे.