Vector illustration of High school building. Vector School Building
येरवडा (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र माझा न्युज – येरवडा आणि लगतच्या परिसरात असलेल्या उर्दू, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील प्रशासकीय गोंधळ आणि मनमानी कारभारामुळे पालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या ‘अपार आयडी’ (APAAR ID) मध्ये नाव नोंदवणे, आधार कार्ड अथवा शाळेच्या दाखल्यामध्ये (LC) नावात बदल करणे, आणि वाढीव फीचा मनस्ताप यांसारख्या विविध समस्यांमुळे पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
या किरकोळ वाटणाऱ्या दुरुस्ती कामांसाठी पालकांना वारंवार शाळेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. शाळांचे मुख्याध्यापक आणि लिपिक (क्लर्क) पालकांच्या अर्जांकडे व तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
नावालाच उरल्या पालक-शिक्षक समित्या
शासकीय नियमांनुसार प्रत्येक शाळेत ‘पालक-शिक्षक समिती’ (PTA) असणे बंधनकारक आहे. मात्र, येरवड्यातील अनेक शाळांमध्ये या समित्या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून येत आहे. पालकांच्या समस्यांचे निवारण करण्यात या समित्या पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत.
फी न भरल्यास विद्यार्थ्यांचा मानसिक छळ
सर्वात गंभीर बाब म्हणजे, काही शाळांमध्ये केवळ फी थकीत आहे किंवा वेळेत भरली नाही म्हणून चिमुकल्या विद्यार्थ्यांना थेट परीक्षेला बसू न देणे, वर्गाबाहेर उभे ठेवणे किंवा त्यांचा मानसिक छळ करण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तक्रार कुठे आणि कशी करावी? पालकांसाठी महत्त्वाची माहिती
अनेकदा पालकांना आपल्या हक्कांची आणि तक्रार निवारण यंत्रणेची पुरेशी माहिती नसते. शाळा प्रशासन, मुख्याध्यापक किंवा शाळा समिती स्तरावर समस्या सुटली नाही, तर पालकांनी खालील टप्प्यांवर दाद मागणे आवश्यक आहे:
1. पहिली पायरी (शाळा स्तर): मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे लेखी अर्ज द्यावा.
2. दुसरी पायरी (गट शिक्षण अधिकारी BEO): शाळेने दखल न घेतल्यास, परिसराचे प्राथमिक गट शिक्षणाधिकारी (Block Education Officer) यांच्याकडे थेट लेखी तक्रार नोंदवावी.
3. तिसरी पायरी (वरिष्ठ शिक्षण अधिकारी): गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून योग्य ती कारवाई न झाल्यास, वरिष्ठ शिक्षण अधिकारी (शिक्षणाधिकारी – प्राथमिक/माध्यमिक) किंवा पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाशी संपर्क साधावा.
प्राथमिक गट शिक्षणाधिकारी: विजय अवारी
मोबाईल नं: +919552561673
माध्यमिक गट शिक्षणाधिकारी: आशा उबाळे
मोबाईल नं: +919665094200