येरवडा मनोरुग्णालयातील वृक्षतोड प्रकरण गाजणार?; ५,९३५ झाडे नेमकी कुठे लावली, नागरिकांचा सवाल
पुणे : महाराष्ट्र माझा न्युज: येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील विकासकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या वृक्षतोड परवानगीच्या अटींचे पालन झाले आहे का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. परवानगीनुसार १९९ झाडांचे प्रत्यारोपण करणे तसेच ५,९३५ स्थानिक प्रजातींची नवीन झाडे लावणे, त्यांचे GPS Geo-tagging करणे, सात वर्षे संगोपन करणे आणि नियमित प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले होते.
मात्र, ही ५,९३५ झाडे नेमकी कुठे लावण्यात आली, १९९ झाडांचे प्रत्यारोपण कोणत्या ठिकाणी करण्यात आले, त्यांचे Geo-tagging, छायाचित्रे, GPS नोंदी आणि अधिकृत अहवाल कुठे आहेत, याबाबत संबंधित विभाग, कंत्राटदार किंवा प्रकल्पाशी संबंधित यंत्रणेकडून स्पष्ट माहिती उपलब्ध होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वसिम तांबे यांनी केला आहे.
याशिवाय, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या वृक्षतोड परवानगीची तीन महिन्यांची वैधता ५ मे २०२६ रोजी संपुष्टात आली आहे. त्यानंतरही काम सुरू असल्यास ते कोणत्या कायदेशीर आदेश, मुदतवाढ अथवा नव्या परवानगीच्या आधारे सुरू आहे, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणात संबंधित विभागाने मुदतवाढीचा आदेश (असल्यास), ५,९३५ झाडांच्या लागवडीचा संपूर्ण तपशील, Geo-tagging नोंदी, प्रत्यारोपित १९९ झाडांची माहिती, प्रगती अहवाल आणि सर्व संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत. तसेच संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“झाडे कागदावर लावली की प्रत्यक्ष जमिनीवर?” हा प्रश्न आता सार्वजनिक हिताचा विषय बनला असून, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसिम तांबे यांनी केली आहे.