वारजेत पावसाळी वाहिनीच्या कामाचा बोजवारा? दोन महिन्यांपासून नागरिक त्रस्त; पूर्ववत केलेला रस्ताच खचला, डंपर अडकला!

0
IMG_20260714_18402484

वारजे,पुणे,दि:१४ जुलै| प्रतिनिधी
वारजे येथील सह्याद्री शाळा–कॅनॉल रोड परिसरात सुरू असलेल्या पावसाळी वाहिनी (स्टॉर्म वॉटर ड्रेन) प्रकल्पातील कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विविध ठिकाणी खोदकाम सुरू असून, अनेक ठिकाणी कामे अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत. ज्या ठिकाणी रस्ता पूर्ववत केल्याचा दावा करण्यात आला, त्याच ठिकाणी रस्ता खचून राडारोडा वाहतूक करणाऱ्या डंपरचे चाक अडकल्याने कामाच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला जात आहे.
कामाची सुरुवात दत्तनगर कॉर्नरजवळील इंडस्ट्रियल सोसायटी परिसरातून झाली. त्यानंतर दत्तनगर कॉर्नर आणि सह्याद्री शाळेजवळ पावसाळी वाहिनी टाकून चेंबर्स बांधण्यात आले, लोखंडी झाकणेही बसवण्यात आली. मात्र, सह्याद्री शाळा परिसर आणि दत्तनगर कॉर्नर येथे खोदलेले रस्ते अद्याप पूर्णपणे पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, पूर्ववत करण्यात आलेल्या रस्त्याचाच भाग अचानक खचल्याने राडारोडा वाहून नेणाऱ्या डंपरचे चाक त्यात अडकले. या घटनेमुळे रस्ता पुनर्बांधणी करताना आवश्यक दर्जाचा भराव टाकण्यात आला होता का? तांत्रिक निकषांचे पालन झाले का? की काम केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवण्यात आले? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सह्याद्री शाळा–कॅनॉल रोड हा वारजे परिसरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. शाळकरी विद्यार्थी, पालक, पादचारी, दुचाकीस्वार तसेच जड वाहनांची दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा मार्गावर अर्धवट कामे आणि खचणारे रस्ते भविष्यात गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकतात.
स्थानिक नागरिकांनी वारजे-करवेनगर क्षेत्रीय कार्यालय, संबंधित अभियंते आणि ठेकेदार यांच्या कामकाजाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी तसेच सर्व खोदलेले रस्ते तातडीने दर्जेदार आणि एकसंध पद्धतीने पूर्ववत करावेत, अशी मागणी केली आहे.
रस्ता खचण्याची घटना ही केवळ अपघात नसून कामाच्या दर्जाची पोलखोल आहे. आता पुणे महानगरपालिका या प्रकाराची गंभीर दखल घेऊन ठोस कारवाई करणार की नागरिकांच्या सुरक्षिततेकडे पुन्हा दुर्लक्ष होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed