पुण्यात पोलीस हवालदाराची एपीआयला मारहाण; वरिष्ठांशी गैरवर्तन प्रकरणी निलंबन
पुणे : महाराष्ट्र माझा न्युज – चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील हवालदार विवेक रमेश बसनगार यांच्यावर वरिष्ठ अधिकारी, महिला पोलिस कर्मचारी आणि सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) यांच्याशी गैरवर्तन, शिवीगाळ व मारहाण केल्याच्या आरोपांनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त यांनी प्राथमिक चौकशीनंतर ही कारवाई केली.
माहितीनुसार, कर्तव्यावर असताना बसनगार यांनी वरिष्ठ अधिकारी आणि महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी अरेरावीची, अश्लील व जातीवाचक भाषा वापरल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांच्यावर पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.
या कारवाईनंतरही त्यांचे वर्तन सुधारले नसल्याचा आरोप आहे. २६ जून रोजी त्यांनी खडकी पोलिस ठाण्यातील एका पोलिस निरीक्षकांशी अर्वाच्च भाषेत बोलत त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याची नोंद आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तपास पथकातील एपीआय यांच्या केबिनमध्ये जाऊन “माझी स्टेशन डायरी का केली?” असा जाब विचारत मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले. यावेळी त्यांनी शिवीगाळ, धमकावणे तसेच अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याची नोंद स्टेशन डायरीत करण्यात आली आहे.
याच मालिकेत २९ जून रोजी बसनगार यांनी दुचाकी भरधाव व धोकादायक पद्धतीने चालवत एपीआयला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोपही समोर आला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात घुसून “माझ्यावर अन्याय झाला, मला न्याय द्या,” असा आरडाओरडा केल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. प्राथमिक चौकशीत बसनगार यांचे वर्तन पोलिस दलाच्या शिस्तीला बाधा आणणारे व खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्याचे निरीक्षण नोंदवत त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून पुढील विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.