पुण्यात थरार! HP चा भरधाव टँकर संरक्षक भिंत तोडून बंगल्यात घुसला; झाड कोसळले, चालक जखमी
पुणे : कॅम्प परिसरातील साउथ कमांडजवळील केंद्रीय विद्यालय चौकात हिंदुस्थान पेट्रोलियम (HP) कंपनीचा भरधाव टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट एका बंगल्याच्या आवारात घुसल्याची थरारक घटना घडली. टँकरने बंगल्याची संरक्षक भिंत तोडून आवारातील झाडाला जोरदार धडक दिली. या धडकेत झाड कोसळले असून, टँकरचालक जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अशोक गायकवाड (वय ३०, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) असे जखमी चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा टँकर पूना क्लब परिसरातून लोणी काळभोरच्या दिशेने जात होता. साउथ कमांड येथील केंद्रीय विद्यालय चौकात अचानक चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव टँकर रस्त्याच्या बाजूला जाऊन बंगल्याची संरक्षक भिंत तोडत थेट आवारात घुसला.
टँकरच्या केबिनमध्ये चालक अडकला; नागरिकांनी केली सुटका
अपघातानंतर चालक टँकरच्या केबिनमध्ये अडकला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत चालकाला केबिनमधून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पुणे महापालिका आणि पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी कोसळलेल्या झाडाच्या फांद्या छाटून परिसर मोकळा केला. या अपघातात बंगल्याच्या संरक्षक भिंतीसह आवारातील मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
भरवस्तीत भरधाव टँकर थेट बंगल्याच्या आवारात घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.