वारजे–चांदणी चौक सर्व्हिस रोडवर रिक्षांचा रोजचा ठिय्या; वाहतूक पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर.!
वारजे | पुणे :९सप्टेंबर:वारजे हायवे चौक ते चांदणी चौक, कोथरूडकडे जाणाऱ्या उड्डाणपूलालगतच्या सर्व्हिस रोडवर तीनचाकी, सहा सीटर रिक्षांचा नियमित ठिय्या होत असल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने रिक्षा उभ्या राहत असल्याने या मार्गावरील वाहतुकीच्या शिस्तीचा आणि रस्ता मोकळा ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी रिक्षांचा हा ठिय्या दिसून येतो, त्यापासून वारजे वाहतूक पोलिस चौकी अवघ्या काही पावलांवर आहे. त्यामुळे दररोज दिसणाऱ्या या परिस्थितीकडे वाहतूक विभागाचे लक्ष आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्व्हिस रोड हा वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. अशा ठिकाणी रिक्षा नियमितपणे थांबत असल्यास त्याचा वाहतुकीवर नेमका किती परिणाम होतो, तसेच रिक्षांना या ठिकाणी थांबण्याची अधिकृत परवानगी आहे का, याची संबंधित विभागाने पाहणी करण्याची गरज आहे.
रिक्षा चालकांची उपजीविका आणि प्रवाशांची सोय महत्त्वाची असली, तरी वाहतुकीला अडथळा होणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रिक्षांसाठी नियोजित थांबा निश्चित करणे किंवा विद्यमान थांब्याचे नियमन करणे, हा पर्याय प्रशासनाने तपासणे गरजेचे आहे.
चौकी अगदी जवळ असूनही रिक्षांचा ठिय्या नियमितपणे सुरू असल्याने आता वाहतूक विभाग या ठिकाणी पाहणी करून वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट करणार का आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोणती उपाययोजना करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४