दारूच्या नशेत कायद्याचा रखवालदारच भरकटला!तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पोलीस हवालदाराला अटक; कर्तव्यावर गैरहजर असताना ‘प्रतिमा मलीन’, अखेर निलंबनाची कारवाई
पुणे : महाराष्ट्र माझा न्युज – कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील एका हवालदारानेच दारूच्या नशेत तरुणीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, संबंधित पोलीस हवालदार हा तब्बल १७ जुलै २०२६ पासून विना परवाना कर्तव्यावर गैरहजर असल्याचेही समोर आले आहे. म्हणजे कर्तव्यावर हजर राहण्याची शिस्त नाही, मात्र दारूच्या नशेत नागरिकांना त्रास देण्यासाठी मात्र वेळ असल्याचा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
बबन अशोक वाघ असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून तो शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघ हा १७ जुलैपासून विना परवाना कर्तव्यावर गैरहजर होता. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी त्याने दारूच्या नशेत एका तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित तरुणीने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून वाघ याला अटक केली.
घटनेचा अहवाल चतुःश्रृंगी पोलिसांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ही माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाला दिली. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी हवालदार बबन वाघ याला निलंबित केले आहे.
सवाल मात्र मोठा—इतके दिवस गैरहजर असतानाही कारवाई का झाली नाही?
या प्रकरणामुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एखादा पोलीस कर्मचारी दीर्घकाळ विना परवाना कर्तव्यावर गैरहजर असताना त्याची वरिष्ठांनी वेळीच दखल घेतली का? की गंभीर गुन्ह्याचा आरोप झाल्यानंतरच प्रशासनाला गैरहजेरीची आठवण झाली?
सामान्य नागरिकाने शिस्त मोडली तर कायद्याचा धाक दाखविला जातो; मात्र कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या शिस्तभंगाकडे वेळेवर लक्ष दिले जाते का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
पोलीस दलाची प्रतिमा जनतेच्या विश्वासावर उभी असते. त्यामुळे ‘प्रतिमा मलीन झाली म्हणून कारवाई’ करण्यापेक्षा, प्रतिमा मलीन होईल असे कृत्य घडण्यापूर्वीच शिस्तीचा अंकुश ठेवणे आवश्यक नाही का? असा उपरोधिक प्रश्नही या घटनेनंतर चर्चिला जात आहे.
कायद्याचे संरक्षण करणाऱ्या वर्दीवरच अशा घटनांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना, या प्रकरणात पुढील कायदेशीर आणि विभागीय कारवाई कितपत कठोर होते, याकडे आता लक्ष लागले आहे.