मालमत्ता कर कमी करण्यासाठी १.२० लाखांची लाच; महापालिका लिपिकाला रंगेहाथ पकडले

सांगवीतील आनंदनगरमध्ये एसीबीची कारवाई; कर आकारणी विभागातील लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र माझा न्युज-…

Spread the love
bribe-4_2026081766469

सांगवीतील आनंदनगरमध्ये एसीबीची कारवाई; कर आकारणी विभागातील लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र माझा न्युज- मालमत्ता कर कमी करून देण्याचे आमिष दाखवत १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. सांगवी परिसरातील आनंदनगर येथे गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात उमेश सुभाष कुटे (वय ३७) याला पकडण्यात आले असून, तो सांगवी येथील महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागीय कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. याप्रकरणी एका ५९ वर्षीय नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदाराने पिंपळे गुरव परिसरातील जुन्या जागेवर तीन मजली इमारत बांधली असून, या इमारतीचा मालमत्ता कर कमी करण्यासाठी २० ऑगस्ट २०२६ रोजी महापालिकेच्या सांगवी कार्यालयात अर्ज केला होता. तक्रारीनुसार, या अर्जासंदर्भात कुटे याने तक्रारदाराशी संपर्क साधून वार्षिक मालमत्ता कर ९१ हजार ४७२ रुपयांवरून ५० हजार रुपयांच्या आत करून देण्याचे आश्वासन दिले.

या कामासाठी सुरुवातीला दीड लाख रुपयांची लाच मागण्यात आली. त्यानंतर चर्चेनंतर १ लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर ३ सप्टेंबर रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

सांगवीतील आनंदनगर परिसरातील स्विमिंग टँक रस्त्यावर गुरुवारी कुटे याने तक्रारदाराकडून १ लाख २० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी कुटे याच्याविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Spread the love

You may have missed