ईद मिरवणुकांमध्ये लाउडस्पीकर वापरावर बंदी हवी, जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण

मुंबई: जर गणेशोत्सवात लाउडस्पीकर आणि साउंड सिस्टीमचा वापर हानिकारक ठरतो, तर ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकांमध्ये देखील याच प्रकारे हानी पोहोचू शकते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले.
ईदच्या मिरवणुकांमध्ये डीजे, डान्स आणि लेझर लाइट्सच्या वापरावर बंदी घालावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली.
याचिकाकर्त्यांनी दावा केला की, कुराण व हदीसमध्ये कोणत्याही धार्मिक सणासाठी डीजे किंवा लेझर लाइट्सच्या वापराची शिफारस केलेली नाही. याचिकेद्वारे, ईदच्या मिरवणुकांमध्ये लाउडस्पीकर आणि अन्य साउंड सिस्टीमच्या वापराला परवानगी न देण्याचे आदेश महापालिका आणि पोलिसांना देण्याची मागणी करण्यात आली आहे.
न्यायालयाने यावेळी गेल्या महिन्यातील आदेशाचा संदर्भ दिला, ज्यामध्ये ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत, ठरवलेल्या ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या साउंड सिस्टीम्सच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.
न्यायालयाने स्पष्ट केले की, जे गणेशोत्सवात हानिकारक ठरते तेच ईदच्या मिरवणुकांसाठी देखील लागू आहे.