पुणे शहरात जड वाहनांना १० दिवसांची तात्पुरती बंदी; वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
पुणे, दि. १२ : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि जड वाहनांमुळे होणाऱ्या जीवघेण्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५ जून ते २४ जून २०२६ या कालावधीत जड, अवजड आणि बहु-अॅक्सल वाहनांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना शहरातील रस्ते आणि पर्यायी मार्गांची क्षमता मर्यादित असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई आणि सातारा या महामार्गांवरून शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांमुळे अंतर्गत रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
विशेषतः मगरपट्टा आणि खराडी परिसराला जोडणारा मुंढवा येथील चंचलाताई कोद्रे पूल हा प्रमुख आणि एकमेव मार्ग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून अपघातांच्याही घटना वाढल्या आहेत. चालू वर्षात पुणे शहरात आतापर्यंत ३० प्राणांतिक अपघात झाले असून त्यामध्ये ३१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या अहवालानुसार प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ही बंदी १५ जून रोजी मध्यरात्रीपासून लागू होऊन २४ जून रोजी मध्यरात्रीपर्यंत प्रभावी राहणार आहे. या कालावधीत पुणे शहरातून केवळ मार्गक्रमण करणाऱ्या जड वाहनांना शहरात प्रवेश न देता पर्यायी मार्गांवर वळविण्यात येणार आहे.
सोलापूरकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने केडगाव चौफुला – न्हावरे – तळेगाव ढमढेरे – शिक्रापूर – चाकण मार्गे अथवा उरुळी कांचन – कोरेगाव मूळ – आष्टापूर मार्गे प्रवास करतील. मुंबईकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तळेगाव दाभाडे – चाकण – शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे – न्हावरे – केडगाव चौफुला हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच कात्रज – मंतरवाडी फाटा – वाढकी – दिवेघाट – सासवड – जेजुरी या मार्गाचाही पर्याय उपलब्ध राहणार आहे.
मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी तळेगाव – चाकण – खेड – मंचर – नारायणगाव – आळेफाटा मार्ग तसेच नाशिक फाटा – भोसरी – चाकण – शिक्रापूर – शिरूर मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाला परिणामकारक उपाययोजना करता येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.