शाळांच्या परिसरात निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री; एफडीएचा दणका, पाच आस्थापनांचे व्यवसाय बंद!
पुणे : शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे विभागातील ४३ शाळांच्या परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल २९ आस्थापना आढळून आल्या. त्यापैकी पाच आस्थापनांचे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांच्या परिसरात सर्रास विकल्या जाणाऱ्या निकृष्ट आणि आरोग्यास अपायकारक खाद्यपदार्थांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि पौष्टिक अन्न मिळावे, या उद्देशाने एफडीएकडून शाळा, महाविद्यालये आणि त्यांच्या परिसरातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी केली जात आहे. शाळांच्या आवारात तसेच प्रवेशद्वारापासून ५० मीटरच्या परिसरात निकृष्ट दर्जाचे आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरणारे खाद्यपदार्थ विकण्यास मनाई करण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि वसतिगृहांमधील उपाहारगृहे, खानावळी तसेच फूड कोर्ट चालकांना भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाची (एफएसएसएआय) नोंदणी किंवा परवाना घेणे बंधनकारक आहे. अन्न तयार करताना स्वयंपाकघराची स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, अन्नाची योग्य साठवणूक, कच्चे आणि शिजवलेले अन्न स्वतंत्र ठेवणे, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि कीटक नियंत्रण या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांना सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्यानंतरही त्रुटी दूर न केल्यास नोंदणी किंवा परवाना निलंबित अथवा रद्द केला जाणार आहे. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्यास परवाना तत्काळ निलंबित करण्याची तरतूद आहे. अस्वच्छ परिस्थितीत अन्न तयार केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड, तर आवश्यक परवान्याशिवाय व्यवसाय केल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
शाळांच्या परिसरात जंक फूडला बंदी
शाळांच्या आवारात आणि प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात जास्त मीठ, साखर आणि चरबीयुक्त पदार्थ, पॅकबंद चिप्स, कुरकुरे, तळलेले पदार्थ, साखरयुक्त शीतपेये, सोडा, एनर्जी ड्रिंक्स आणि पोषणमूल्य नसलेल्या जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या पदार्थांऐवजी विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि सकस आहार उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
६ हजार ६५६ शाळांमधील शिक्षकांना मार्गदर्शन
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या निर्देशानुसार या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १ एप्रिल ते १९ नोव्हेंबर या कालावधीत पुणे विभागात १७ कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळांमध्ये ६ हजार ६५६ शाळांमधील ७ हजार २७५ शिक्षकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच शाळांच्या परिसरातील खाद्यपदार्थ विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.