१५ स्पा सेंटरची चौकशी करा; डीजीपी कार्यालयाकडून पोलिस आयुक्तांना सूचना; परदेशी नागरिकांच्या वास्तव्य व रोजगाराबाबत तक्रार; परवाने, व्हिसा आणि पोलिस पडताळणी तपासण्याची मागणी
पिंपरी, दि. ५ : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या १५ स्पा सेंटरची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र पोलिस महासंचालक (डीजीपी) कार्यालयाने तक्रार पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडे पाठविली आहे. तक्रारीवर आवश्यक कार्यवाही करून त्याची माहिती तक्रारदाराला देण्याच्या सूचना डीजीपी कार्यालयाकडून करण्यात आल्या आहेत.
‘समाज स्पा कल्याणकारी असोसिएशन’चे डॉ. प्रदीप केंदळे यांनी केलेल्या तक्रारीत पिंपरी-चिंचवड परिसरातील काही स्पा सेंटरमध्ये थायलंडसह अन्य देशांतील नागरिक काम करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित परदेशी नागरिकांकडे भारतात रोजगार करण्यासाठी आवश्यक वैध परवाना, व्हिसा, पोलिस पडताळणी आणि इतर कागदपत्रे आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिघी ते बावधनपर्यंतच्या स्पांचा समावेश
तक्रारीत दिघी, भोसरी, सांगवी, चिंचवड, हिंजवडी, रावेत, कळेवाडी आणि बावधन परिसरातील १५ स्पा सेंटरची नावे नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये स्वस्तिक (दिघी), सिल्वर (एमआयडीसी भोसरी), मर्फी (लोढा), निद्रा (सांगवी), मर्फी (चिंचवड), एल प्रो मॉल व कोरा (चिंचवड), प्रीमियर प्लाझा, अनया व सोल (हिंजवडी), वॉचीस व सिल्वर (रावेत), यश व अनया (कळेवाडी) आणि असवा (बावधन) यांचा समावेश आहे.
परवाने, व्हिसा व कागदपत्रांची तपासणी
संबंधित स्पा सेंटरचे आवश्यक परवाने व नोंदणी, मंजूर व्यवसायाची वेळ आणि प्रत्यक्ष व्यवसायाची वेळ यांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच परदेशी नागरिकांचे पासपोर्ट, व्हिसा, पोलिस पडताळणी आणि आरोग्य तपासणीसह इतर आवश्यक कागदपत्रे तपासावीत, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
महिला कर्मचाऱ्यांकडून रात्रीच्या वेळी काम करून घेताना लागू असलेल्या कायदेशीर अटींचे पालन केले जाते का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीत बेकायदेशीर रोजगार, मानवी तस्करी, बेकायदेशीर वास्तव्य किंवा अन्य कायद्यांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
चौकशीच्या अहवालाकडे लक्ष
दरम्यान, तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या स्पा सेंटरविरुद्ध गैरप्रकार सिद्ध झाल्याचे या कागदपत्रावरून स्पष्ट होत नाही. डीजीपी कार्यालयाच्या सूचनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि संबंधित आस्थापनांच्या कागदपत्रांमध्ये काही अनियमितता आढळते का, याकडे आता लक्ष लागले आहे.