विमाननगरमध्ये पार्किंगचा बोजवारा; वाहतूक कोंडीने नागरिक व शाळकरी विद्यार्थी बेजार; ‘नो पार्किंग’चे फलक फक्त शोभेपुरते? विमानतळ रस्त्यावर अनधिकृत वाहनांच्या रांगा

0
IMG-20261002-WA0003

पुणे : दि. ३ : विमाननगर परिसरातील विस्कळीत पार्किंग व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, रस्त्यांसह पदपथांवरही वाहने बेकायदा उभी केली जात असल्याने पादचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विमाननगर परिसरातील पार्किंग व्यवस्था तातडीने सुरळीत करून पी वन-पी टू पार्किंग नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुणे शहरातील वाहतूक, पार्किंग आणि पादचारी मार्गांच्या विविध प्रश्नांबाबत आम आदमी पार्टीच्या शहरस्तरीय शिष्टमंडळाने वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी विमाननगरमधील पार्किंगच्या समस्येकडे शीतल कांडेलकर यांनी विशेष लक्ष वेधले.

कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत असून, पदपथांवरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली जागाही कमी झाली आहे. परिणामी या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक या मार्गावरील वाहतूक आणि पार्किंगच्या समस्येबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

विमाननगर परिसरासाठी पी वन-पी टू पद्धतीनुसार पार्किंगचे नियोजन करण्यात आले असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. वाहनतळासाठी निश्चित जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच रस्ते आणि पदपथांवरील अनधिकृत पार्किंगविरोधात सातत्याने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

विमानतळ परिसरातील विमानतळ चौक आणि विमाननगर रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या विविध बाबींकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. चौकात वाहतूक पोलीस उपस्थित असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

याशिवाय विमानतळ रस्त्यावर ‘नो पार्किंग’चे फलक लावलेले असतानाही अनेक व्यावसायिक चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला एकामागोमाग उभी केली जात आहेत. या वाहनांमुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. मात्र या नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

विशेष म्हणजे चौकाच्या पलीकडे वाहतूक पोलीस चारचाकी वाहनांची तपासणी करताना दिसतात, मात्र वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बस आणि अनधिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने उद्भवत असतानाही प्रभावी उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई, नियमित तपासणी आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन तातडीने राबवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक या मार्गावरील वाहतूक आणि पार्किंगच्या समस्येबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, धनंजय बनकर, सुभाष कारंडे, सतीश यादव, शंकर थोरात, सुनील सौदी, संतोष काळे, मिलिंद ओव्हाळ, मिलिंद सरोदे, उमेश बागडे, सुनीता काळे, संजय कटारनवरे आणि शिवाजी डोलारे उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

You may have missed