स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; मालकाला अटक, तीन तरुणींची सुटका;

IMG_20260815_195313

मांजरीतील निर्वाना स्पावर मुंढवा पोलिसांची कारवाई; ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : महाराष्ट्र माझा न्युज – स्पाच्या नावाखाली महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी स्पामालकाला अटक केली. मांजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोलापूर रस्त्यावरील कुमार मिडॉजसमोरील पाटील टॉवरमधील निर्वाना स्पा येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कारवाईदरम्यान तीन तरुणींची सुटका केली.

या प्रकरणी पोलिस हवालदार शुभांगी तारु यांनी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सेबु ऊर्फ शेखर मुबारकअली शेख (वय २९, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार अजिर उद्दीन (रा. जामुनमुख, नागांव, आसाम) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त जीवन बेनिवाल यांना सोलापूर रस्त्यावरील निर्वाना स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मीता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाईचे नियोजन केले.

त्यानुसार १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलिसांनी बनावट ग्राहक स्पामध्ये पाठविला. बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी स्पावर छापा टाकला. बनावट ग्राहकाकडून काऊंटरवर स्पामालकाने अडीच हजार रुपये घेतल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर मसाज करणाऱ्या महिलेकडून वेश्यागमनासाठी साडेसात हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून, मोबाईल फोनसह अन्य साहित्य असा एकूण ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष म्हणजे, या स्पाविरुद्ध यापूर्वी चंदननगर पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची एफआयआरची प्रत पोलिसांना आढळून आली. चंदननगर परिसरात कारवाई झाल्यानंतर स्पामालकाने आपला व्यवसाय मांजरी परिसरात हलविल्याचे तपासात दिसून येत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम करीत आहेत.

Spread the love

You may have missed