हडपसर-मुंडवा क्षेत्रातील मंगल कार्यालयांच्या परवाना प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; तक्रारीनंतरही चार महिन्यांपासून कारवाईची माहिती नाही
पुणे : महाराष्ट्र माझा न्युज- हडपसर-मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मंगल कार्यालये, सभागृहे, बँक्वेट हॉल आणि लॉज यांच्या परवाना प्रक्रियेमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर अद्यापही ठोस माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणामुळे संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रियाज मोहिदीन शेख यांनी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी हडपसर-मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत क्षेत्रातील अनेक मंगल कार्यालये, सभागृहे, बँक्वेट हॉल आणि लॉज यांच्याकडून परवान्यांच्या अटींचे उल्लंघन होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
तक्रारीनुसार, काही आस्थापने आवश्यक वैध परवाना नसतानाही सुरू असल्याचा संशय असून काही ठिकाणी परवाना मंजुरी व नूतनीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच सन २०२५ ते २०२६ या कालावधीत अनेक आस्थापनांनी परवाना नूतनीकरण न करता व्यवसाय सुरू ठेवल्याचा आरोपही करण्यात आला होता.
मंगल कार्यालये, सभागृहे, बँक्वेट हॉल आणि लॉज यांना परवाने देताना आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर निकष आणि नियमावलींची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याची शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली होती. नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर आवश्यक दंडात्मक कारवाई होत नसल्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित आस्थापनांची सखोल चौकशी करून मुदत संपलेल्या किंवा परवाना नसलेल्या आस्थापनांवर कारवाई करावी, नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच परवाना प्रक्रिया पूर्णतः पारदर्शकपणे राबवावी, अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, तक्रारीबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती घनवट यांनी, “वरिष्ठ निरीक्षकांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांना लेखी मेमो देण्यात आला असून याबाबत माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली आहे,” असे सांगितल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
मात्र, तक्रार दाखल होऊन चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही २३ जून २०२६ पर्यंत तक्रारदाराला कोणतीही अधिकृत माहिती किंवा कारवाईचा अहवाल देण्यात आलेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणात नेमकी काय कारवाई केली, याबाबत माहिती सार्वजनिक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
“या प्रकरणाचा पाठपुरावा करताना हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी कारवाई तसेच माहिती देण्याबाबत कशी टाळाटाळ करतात, याचा सविस्तर पर्दाफाश आमच्या पुढील मालिकेत करण्यात येणार आहे.”