येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी; आरोग्य प्रमुखांना निवेदन
पुणे, प्रतिनिधी : येरवडा परिसरातील सुमारे अडीच लाख नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत करावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गौरव शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांना निवेदन दिले आहे.

गेल्या ११ महिन्यांपासून येरवड्यातील आरोग्य सुविधांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रे, प्रत्यक्ष पाहणी आणि नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
रुग्णालयात २४ तास पूर्णक्षमतेची आपत्कालीन सेवा उपलब्ध नसणे, भूलतज्ञांसह तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता, गर्भवती महिलांना विविध तपासण्या व प्रसूतीसाठी अन्य रुग्णालयांमध्ये जावे लागणे, तसेच पाच मजली इमारत असूनही तिचा पूर्ण वापर होत नसल्याच्या बाबी समोर आल्याचे त्यांनी नमूद केले.
निवेदनात रुग्णालयात २४ तास आपत्कालीन सेवा सुरू करणे, सामान्य व सिझेरियन प्रसूतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे, आयसीयू व व्हेंटिलेटर सुविधा सुरू करणे, तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ व नर्सिंग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, रक्त तपासणी, एक्स-रे व सोनोग्राफीसारख्या सेवा मोफत आणि चोवीस तास उपलब्ध करून देणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच महानगरपालिकेशी करार नसताना खासगी संस्थांच्या नावाखाली रुग्णालयातील जागांवर झालेल्या कथित अतिक्रमणांवर कारवाई करावी आणि संपूर्ण इमारतीचा वापर सार्वजनिक आरोग्य सेवांसाठी करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
“हा लढा कोणत्याही राजकीय हेतूने नसून येरवड्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या हक्कासाठी आहे. राजीव गांधी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत आणि नागरिकांना आवश्यक सुविधा मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू राहील,” असे गौरव शिंदे यांनी सांगितले.