नोंदणी करा! वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
१ जुलैपासून एचएसआरपी बंधनकारक वाहन सुरक्षेला अधिक बळकटी राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलैपासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य केले आहे.
वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन एचएसआरपी बसविण्यासाठी आगाऊ वेळ निश्चित करावी. संबंधित वाहनधारकांनी ३० जून २०२६ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
— प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
मुदतवाढीचा लाभ घ्या : सरनाईक
मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी एचएसआरपी ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत वेळेत एचएसआरपी बसवून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
रस्त्यावर विशेष तपासणी मोहीम
सरनाईक पुढे म्हणाले की, ज्या वाहनधारकांनी मुदतीत एचएसआरपी बसवून घेतले नाही किंवा अपॉइंटमेंट नोंदवली नाही, अशा वाहनांची १ जुलै २०२६ पासून रस्त्यावर विशेष तपासणी मोहीम राबवून पडताळणी करण्यात येईल. नियमानुसार मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल तसेच १ हजार रुपयांपर्यंत तडजोड शुल्क आकारण्यात येईल.
शासनाला सहकार्य करावे!
वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरून एचएसआरपीसाठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन परिवहनमंत्र्यांनी केले आहे. राज्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया गांभीर्याने घेत शासनाला सहकार्य करावे, असे मंत्री म्हणाले.