पुणे: कासारवाडी छाप्यात गॅस साठेबाजीचा भंडाफोड; येरवड्यातील एजन्सींवरही संशयाची छाया
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथे अन्न व नागरी पुरवठा विभागाने टाकलेल्या धडक छाप्यात ५४ भरलेले आणि २०७ रिकामे गॅस सिलिंडर जप्त करत मोठ्या साठेबाजीचा पर्दाफाश केला. इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा गैरफायदा घेतला जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर येरवडा परिसरातील गॅस वितरण व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या भागात भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडियन गॅसच्या मिळून सुमारे १५ एजन्सी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने एजन्सी असतानाही टंचाई आणि तक्रारींबाबत ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
येरवड्यातील फुलेनगर परिसरातील प्रगती गॅस एजन्सीवर ग्राहकांना बुकिंगनंतर वेळेत सिलिंडर न पोहोचवल्यामुळे भारत पेट्रोलियम कंपनीकडून ४,७२,६२२ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच विश्रांतवाडी येथील खांदवे भारत गॅस एजन्सीला कंपनीतर्फे ‘शो कॉज’ नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाचे परिमंडळ अधिकारी चांगदेव नागरगोजे यांनी दिली.
नागरगोजे पुढे म्हणाले की, गॅस वितरणातील अनियमितता रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत. नागरिकांना गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर वेळेत मिळत नसल्यास त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ई-परिमंडळ कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर साठेबाजीविरोधातील कारवाईमुळे एकीकडे गैरप्रकार उघडकीस येत असताना, दुसरीकडे शहरातील वितरण व्यवस्थेतील त्रुटीही समोर येत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.