विश्रांतवाडीत अवैध धंद्यांना उधाण; पोलीस प्रशासनावर नागरिकांचा सवाल
पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कडक आदेश दिले असतानाही विश्रांतवाडी परिसरात अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे समोर आले आहे. मटका, जुगार तसेच गांजा विक्रीसारखे बेकायदेशीर प्रकार विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पोलीस आयुक्तांच्या आदेशाला जणू केराची टोपली दाखवली जात आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. एवढ्या जवळपास हे सर्व प्रकार सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती नाही का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांना या घडामोडींची कल्पना आहे की नाही, याबाबतही शंका व्यक्त होत आहे. तसेच झोन ४ चे डीसीपी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित अवैध धंद्यांवर कारवाई करतील का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, या प्रकारांमुळे परिसरातील तरुण पिढीवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलून अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.