हळदीच्या पाकिटांत गांजा लपवून विक्री; बाणेर पोलिसांची कारवाई, दोघे अटकेत
पुणे, बाणेर पोलिसांनी अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई करत हळदीच्या पाकिटांत गांजा लपवून विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. या कारवाईत एकूण १६ किलो गांजा आणि परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे (दोघे रा. पिंपरी-चिंचवड) अशी असून, ते शहरातील विविध भागांत गांजाची विक्री करत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, संशय टाळण्यासाठी आरोपी गांजा हळदीच्या पाकिटांत लपवून ठेवत असत. तसेच, आपला बेकायदेशीर व्यवसाय लपवण्यासाठी ते एका खासगी कंपनीत नोकरी करत होते.
बाणेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी बाणेर परिसरात येणार होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या पिशवीत हळदीची पाकिटे आढळून आली. तपासणी केली असता या पाकिटांमध्ये गांजा लपवलेला असल्याचे स्पष्ट झाले. प्रारंभी पोलिसांनी सुमारे ३ किलो गांजा जप्त केला.
पुढील चौकशीत आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील त्यांच्या घरात आणखी गांजा साठवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी घरावर छापा टाकून आणखी १३ किलो गांजा जप्त केला. अशा प्रकारे एकूण १६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी गांजा कोठून आणला आणि कोणाला विक्री करणार होते, याचा पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले असून, शहरात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.