पुणेकरांना मोफत बस व मेट्रो सेवा देणार; अजित पवारांची ग्वाही; दोन्ही राष्ट्रवादींचा पुण्यासाठी संयुक्त जाहीरनामा जाहीर

IMG_20260110_210427.jpg

पुणे: पुणे महापालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आल्यास पुणेकरांना बस आणि मेट्रो सेवेचा मोफत लाभ देण्यात येईल, अशी ठाम ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शनिवारी दिली. या निर्णयामुळे शहरातील प्रदूषण कमी होईल, वाहतूक कोंडी सुटेल आणि नागरिकांचा वेळ तसेच पैसा वाचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पहा व्हिडिओ

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने पुणे शहरासाठी अष्टसूत्री प्रगतीचा संयुक्त जाहीरनामा यावेळी प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, दीपक मानकर, सुभाष जगताप, श्रीकांत पाटील, विशाल तांबे, प्रदीप देशमुख यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, पुणे शहरात दररोज सुमारे ३० लाख वाहने रस्त्यावर धावतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे इंधनाचा अपव्यय आणि वेळेचे नुकसान होऊन पुणेकरांचे दररोज सुमारे ३० कोटी रुपयांचे नुकसान होते. वार्षिक नुकसान तब्बल १० हजार ८०० कोटी रुपयांपर्यंत जाते.

मोफत बस आणि मेट्रो सेवा सुरू केल्यास नागरिक मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीकडे वळतील. यासाठी पीएमपीएमएल आणि मेट्रो या दोन्ही संस्थांना मिळून वर्षाला केवळ ३०० कोटी रुपये खर्च येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. ही योजना आर्थिकदृष्ट्या शक्य असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा दावा त्यांनी केला.

संयुक्त जाहीरनाम्यातून पुण्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यावरण, नागरिकांच्या सोयीसुविधा आणि रोजगारनिर्मिती यांवर भर देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Spread the love

You may have missed