पुणे: महामानवाला ‘बसपा’चे अभिवादन; बाबासाहेबांचे मिशन पूर्ण करण्यासाठी बहुजन एकजूट आवश्यक – डॉ. हुलगेश चलवादी

IMG-20251206-WA0024.jpg

पुणे | ६ डिसेंबर २०२५ — विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पक्षाच्या वतीने पुणे स्टेशनजवळील आणि कलेक्टर कार्यालयासमोरील आंबेडकर पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने बसपा पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांचे अपूर्ण ‘मिशन’ पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

बसपाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोनचे मुख्य प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी समाजातील शोषित घटकांना शासनकर्ते बनवण्यासाठी बसपा कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, आजच्या काळात संविधानविरोधी आणि आंबेडकरी विचारांना विरोध करणाऱ्या शक्तींचा प्रभाव वाढत असल्याने लोकशाही मूल्ये धोक्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशाचे ऐक्य, लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्व बहुजन विचारधारेच्या संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष आणि विचारवंतांनी एकत्र यावे, असे आवाहन चलवादी यांनी यावेळी केले. “समानता, बंधुता आणि जातीयव्यवस्थेविरोधातील बाबासाहेबांच्या विचारांना बळकटी देण्यासाठी संयुक्त बहुजन चळवळ गरजेची आहे,” असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाला बसपचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हाप्रभारी परशुराम अरुणे, पदाधिकारी शफी शेख, विजय बेदे, जिल्हा महासचिव प्रवीण वाकोडे, तसेच शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष किशोर अडागळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करून सामाजिक न्याय आणि संविधान मूल्यांच्या जपणुकीचा निर्धार व्यक्त केला.

Spread the love

You may have missed