लाकूड, कोळशाचा वापर तातडीने टाळा; पुणे महापालिकेकडून हरित ऊर्जेचा वापर करण्याच्या हॉटेलना सूचना
पुणे, ता. १६ : पुण्यातील वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील बेकरी, हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबा आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये पारंपरिक इंधनाऐवजी हरित इंधनाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या १५ दिवसांत संबंधित व्यावसायिकांनी हरित ऊर्जेचा वापर सुरू करावा, अन्यथा महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील अनेक भागांत दिवसेंदिवस वायू प्रदूषणाची पातळी वाढत आहे. वाहनांचा धूर, बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ, तसेच हॉटेल्स व खाद्य व्यवसायांमध्ये लाकूड, कोळसा आणि तंदूरचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर यामुळे हवेतील प्रदूषक घटक वाढत आहेत. परिणामी नागरिकांना श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ, अॅलर्जी आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शहरातील व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. बेकरी, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थ स्टॉल्स आणि ढाब्यांमध्ये पारंपरिक इंधनाऐवजी एलपीजी, पीएनजी, वीज आणि इतर हरित ऊर्जेचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक इंधनाचा वापर केल्यास धूर कमी होऊन प्रदूषण नियंत्रणास मदत होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वीही अशा व्यावसायिकांना सूचना दिल्या होत्या. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप पारंपरिक इंधनाचाच वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता संबंधित व्यावसायिकांकडून हरित इंधन वापराबाबतची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिका व एमपीसीबीच्या वतीने दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पर्यावरण विभागाने दिला आहे.