कात्रज तलाव परिसरात कबुतरांना खाद्य; प्रशासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष?
पुणे : नानासाहेब पेशवे जलाशय अर्थात कात्रज तलाव परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पाजवळ दररोज मोठ्या प्रमाणात कबुतरांना खाद्य घातले जात असल्याने परिसरात कबुतरांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे कबुतरांना खाद्य घातल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
कात्रज तलाव परिसरात दररोज शेकडो नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच खेळण्यासाठी येतात. मात्र, एका व्यक्तीकडून दररोज कबुतरांना खाद्य घातले जात असल्याने मोठ्या संख्येने कबुतरे एकाच ठिकाणी जमा होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे परिसरात कबुतरांची विष्ठा, पिसे आणि अस्वच्छता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याचा परिणाम केवळ तलाव परिसरापुरता मर्यादित नसून, परिसरातील इमारतींमध्येही कबुतरांचे वास्तव्य वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, पुणे महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य घालण्याच्या प्रकारावर दंडात्मक कारवाई करण्याची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. असे असताना महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेतच हा प्रकार दररोज सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून संबंधित व्यक्तीला सूचना करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यानंतरही कबुतरांना खाद्य घालण्याचा प्रकार सुरूच असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
महानगरपालिकेच्या जागेतच नियमांचे पालन होत नसेल तर कारवाई कोण करणार? नागरिकांच्या आरोग्याचा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असताना प्रशासन केवळ सूचना देऊन थांबणार की प्रत्यक्ष कारवाई करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
कात्रज तलाव परिसरात कबुतरांना खाद्य घालण्याचा प्रकार तातडीने थांबवून संबंधित व्यक्तीला स्पष्ट ताकीद द्यावी. नियमांचे उल्लंघन होत असल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिसरात आवश्यक स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४


